ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे तोडोळी कॅनलला पाणी सोडा
तिव्र आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांकडून पाटबंधारे अधिकाऱ्यांना इशारा

पैठण: तालुक्यातील लोहगांव परिसरातील तोंडोळी येथील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या भाग २ या कॅनलचा अंदाजे पंधरा वर्षांपासून कागदोपत्री प्रचंड गाजावाजा सुरू असून गत वर्षी जानेवारी महिन्यात कॅनलला पाणी सोडणार असे आश्वासन देण्यात आले होते.सदर आश्वासन वर्ष उलटून गेले तरीही कॅनलला पाणी सोडले नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या कॅनलची उभारणी केली त्याच कॅनलला पाणी सोडले जात नसेल तर या दिखाऊ योजनेचा अर्थ काय म्हणून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजीनगर लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता यांना १७ फेब्रुवारी सोमवार रोजी पाणी सोडण्या संदर्भात निवेदन सादर केले आहे.फेब्रुवारी अखेर पर्यंत पाणी सोडा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.सिंचनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी ब्रम्हगव्हाण उपसा सिंंचन योजनेचा भाग एक टप्पा क्रमांक दोन या योजनेचे प्रशासकीय अधिकारी पाणी सोडण्यास टाळाटाळ करत असल्याने स्थानिक शेतकरी वर्गातून संतापाची लाट उसळली जात आहे. वारंवार पाणी सोडण्याची मागणी करुन ही प्रकल्प अधिकारी अद्याप पाणी सोडण्यास तयार नाही.
शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचा अट्टाहास अधिकारी वर्ग करत आहे.जायकवाडी प्रकल्पातील ब्रम्हगव्हाण येथील मुख्य पाणी साठ्यातून कॅनलला पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता तयार नसतील तर शेतकरी लोकशाही मार्गाने मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे करून लवकरच पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यालयावर धडकण्याच्या तयारीत असून. कारभारी उघडे,प्रभाकर तांबे, विठ्ठल आगळे,लहू आगळे, नवनाथ गरड, योगेश पिटेकर, बाळासाहेब,भिकन. यांच्या सह इतर शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले