सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील ‘म्होरक्या’ कोण, शिंदे की ठाकरे?

राजन साळवींनंतर आता भास्कर जाधव देखील शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
मुंबई : सध्या ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली असून पक्षाला जय महाराष्ट्र करत अनेकजण शिवसेना (Shivsena) शिंदे गटात तर काहीजण भाजपात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधीकाळी ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातही आता शिवसेना शिंदे गटाने आपलं वर्चस्व स्थापित केल्याचं दिसून येत आहे. नुकतेच, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे देखील पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले होते. मात्र, आपण नाराज नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. तरीही, आज त्यांनी व्हॉट्सअपला ठेवलेल्या स्टेटसवरुन पुन्हा एकदा भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजन साळवींनंतर आता भास्कर जाधव देखील शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सची सध्या जोरदार चर्चेत कोकणातील राजकारणात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात’, अशा आशयाचे स्टेट्स भास्कर जाधव यांनी ठेवलं आहे. संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा हा व्हिडिओ स्टेट्स ठेवत भास्कर जाधव यांनी पुन्हा लक्ष वेधलं आहे. आपल्या स्टेट्समध्ये त्यांनी उल्लेख केलेला तो म्होरक्या कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण, स्टेटसमधील व्हिडिओत एक मेंढ्याचा कळप पाण्यातून जात असल्याचे दिसून येते, त्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन हा कळप पुढे जात असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन 40 पेक्षा जास्त आमदारांनी देखील अशाचप्रकारे गुवाहटी गाठली होती. त्यामुळे, भास्कर जाधव यांचे हे स्टेटस एकनाथ शिंदेंच्या नेतृ्त्वाशी मिळते-जुळते तर नाही ना, असा तर्क लावला जात आहे.
जाधव यांच्या स्टेटवर राणेंची प्रतिक्रिया
उबाठा शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या स्टेट्सची सध्या चर्चा सुरू आहे. मोरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसेच काय जनावरं पण विश्वास टाकतात. त्यासंदर्भात बोलताना मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. मोरक्या हा उद्धव ठाकरे असून उद्धव ठाकरे यांची लायकी त्यांच्या सहकाऱ्यांना आता कळत आहे. त्या माणसाला स्वतःच्या भावाला, घर सांभाळता येत नाही, तो पक्ष काय सांभाळणार. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली, तेवढी केव्हाही झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक मार्ग काढत वेगवेगळ्या पक्षात जात आहेत. स्वतःचं भविष्य घडवू शकला नाही, तो दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार, अशी टीका मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले जाधव
मी कुठलेही पद मिळवण्यासाठी कधी काम केले नाही. गेले 43 वर्ष मी राजकारणात आहे, मी एवढी पदे उपभोगली आहेत, मी त्याकाळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही, आता का करेल? बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्ध करण्यात आले. मी कधी खोटे बोलत नाही, असे त्यांनी म्हटले. 43 वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे. कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगले काहीतरी घडावे यासाठी माझी तळमळ असल्याचे देखील भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.